RSS

शैक्षणिक अनुभव

✳ कविता तयार करणे :

        या उपक्रमात वर्गातील फलकाचे उभी रेख आखुन दोन भाग करावेत. एका भागात कवितेचा विषय लिहावा तर दुसऱ्या भागात त्या विषयाला यमक जुळणारे शब्द लेखन करावे. त्या यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी विद्यार्थी सरावाने तयार करतात.
    उदाहरणार्थ :
                    “झाड”
     या विषयाचे यमक जुळणारे शब्द विद्यार्थ्याना विचारावेत. जसे,
वाढ, पाड, लाड, माड, जाड इत्यादी.
     यावरून विद्यार्थी कवितेच्या ओळी तयार करतात. जसे,
        एक होते झाड
        त्याचा केला लाड
        झाडाची झाली खुप वाढ
        तो झाला माड
        झाड झाले जाड
  यापद्धतीने मुले कविता तयार करतात. यात प्रथम एक विषय घेऊन सराव घेऊ शकतो व नंतर दोन विषय घेऊन एक कविता बनवण्याचा सराव घेऊ शकतो.

✳ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
१) विद्यार्थी यमक संकल्पना समजून घेऊन अनेक अर्थपूर्ण यमक शब्द शोधतात.
२) यमक शब्द वापरून कवितेच्या ओळी तयार करतात.
३) शब्दांतील किंवा ओळींतील सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतात.
४) पुर्वज्ञानाचा वापर करत अत्यंत अलंकारिक कविता तयार करतात.
५) भाषेच्या काव्य प्रकार निर्मितीचा आनंद विद्यार्थ्याना प्राप्त होतो.

      या उपक्रमाचा मला आलेला अनुभव असा की, माझ्या मुलांनी या पद्धतीने अनेक विषयांवर कविता बनवायला सुरुवात केलीय. पाठ्यपुस्तकातील कविता देखील ते वारंवार वाचून त्यातले यमक शब्द नव्याने आनंद झाल्यासारखे वाचतात. काही इंग्रजी शब्दांचाही यमक वापर करतात. अतिशयोक्ति नाही ठरणार परंतु, तोंडी परीक्षेत मी कविता गायन हा प्रश्न ठेवला होता त्यात बरेच मुले म्हणाली…टीचर, पुस्तकातल्या कवितेपेक्षा मी तयार केलेली कविता म्हणू का….?
    धन्यवाद!!!
🏻

✴ बोलकी वाक्ये :

         या उपक्रमाद्वारे चित्रवाचन / चित्रवर्णन घेताना चित्रातील व्यक्तिना, घटनांना अथवा जागेला काल्पनिक नावे देऊन वाक्ये बनवण्याचा सराव घेतल्यास विद्यार्थी चित्रवर्णन उत्तम रीतीने करतात. या द्वारेच चित्रातील व्यक्तींचे संवाद देखील सांगू शकतात.
     उदा.
“आठवड्याचा बाजार”, हे चित्र आहे. तर विद्यार्थी वर्णन करतात…
१) हा चांदोरीचा बाजार भरला आहे
२) सुनील आईला फळे घेण्यास सांगत आहे.
३) रेखा खेळणी मागत आहे.
४) प्रवीणकाका कपडे विकत आहेत.
    या प्रमाणे काल्पनिक नावे घेऊन चित्रवर्णन करतात.

✴ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
१) विद्यार्थ्याना चित्र आपल्याच ओळखीचे वाटते.
२) चित्रवर्णन करताना मुले काल्पनिक पेक्षाही परिचयाची नावे चित्रातील व्यक्तिना देतात त्यामुळे त्यांना चित्रवर्णन करताना अतिशय आनंद होतो.
३) विद्यार्थी चित्र संबंधी त्याचे पुर्वज्ञानाचा वापर करून चित्रातील व्यक्तींचे संवाद देखील सांगण्याचा प्रयत्न करतो.
४) बोलकी वाक्ये चित्र वर्णन तोंडी करताना व लेखन करताना आपण स्वीकारली तर मुले अधिकाधिक उत्तम चित्रवर्णन करण्यास प्रेरित होतात.
५) या द्वारे मुले गोष्टी देखील खुप सुंदर तयार करतात.

          मला या उपक्रमाचा आलेला अनुभव असा की, मी मुलांना सहज वर्तमान पत्रातील आमच्या नाशिक सिंहस्थ पर्वणीचे शाहीस्नानाचे चित्र मुलांना दाखविले व वर्णन करण्यास सांगितले. मुलांनी मला त्या चित्रातील साधूंचे नावे, त्यांचे आखाड्यांची नावे, आंघोळीच्या वेळी ते म्हणत असलेले श्लोक, पोलिसांचे वाक्ये, गर्दीतील लोकांची नावे इ. या सर्व बाबींचे काही काल्पनिक तर काही परिचयाची नावे घेऊन खुप सुंदर असे चित्र वर्णन केले. मला काही क्षण वाटले की मी टी व्ही वरील लाइव वर्णन ऐकत आहे.
         धन्यवाद!!!

 

टिप्पण्या बंद आहेत.